मनमाड – नवरात्रोत्सवासह आगामी काळात येणारे इतर सण लक्षात घेता प्रवाशांची अतिरिक्त गर्दी होण्याची शक्यता असल्याने मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान चार विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत. या विशेष रेल्वेगाड्यांमुळे नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांचीही सोय होणार आहे.

रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. नाशिक जिल्ह्यातून दररोज नोकरी, व्यवसाय यानिमित्ताने मुंबईला जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. प्रवाशांची संख्या अधिक आणि रेल्वेगाड्यांची संख्या कमी , या स्थितीमुळे प्रवाशांचे हाल होतात. त्यातच जिल्ह्यातील रेल्वे स्थानकांची स्थितीही फारशी चांगली नाही. परंतु, आता या स्थानकांच्या मदतीला सिंहस्थ कुंभमेळा धावून आल्याने त्यांचा चेहरामोहरा बदलण्याची शक्यता आहे.

सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड रेल्वे स्थानकासाठी सुमारे ४९.३३ कोटी रुपये खर्चून विकास केला जाणार आहे. संपूर्ण काम वर्षभरात पूर्ण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. देश-विदेशातून अनेक पर्यटक नाशिकला भेट देत असतात, त्यामुळे शहराचे सौंदर्य वृद्धिंगत व्हावे आणि पर्यटनाला चालना मिळावी, यासाठी रेल्वे प्रशासनाने या स्थानकाची नव्याने इमारत उभारण्याचा निर्णय घेतला आहे.

नाशिक रोड रेल्वेस्थानकाचे आधुनिकीकरण केले जाणार आहे. या कामामुळे स्थानक अधिक आकर्षक आणि अत्याधुनिक होणार आहे. सिंहस्थाच्या कामाच्या देखरेखनिमित्त नाशिक रोड रेल्वेस्थानकातर अधिकाऱ्यांचे पाहणी दौरे वाढले आहेत.

एकिकडे नाशिकरोड रेल्वे स्थानकाचे काम वेग घेणार असताना नाशिक जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांना आगामी नवरात्रोत्सवासह इतर सणांसाठी रेल्वेकडून आनंददायक बातमी मिळाली आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्यासाठी मुंबईतील लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान चार साप्ताहिक विशेष रेल्वे गाड्या धावणार आहेत.

त्यानुसार रेल्वे गाडी क्रमांक ०७६०४ ही विशेष गाडी २३ ते ३० सप्टेंबर या कालावधीत दर मंगळवारी लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथून १६.३५ वाजता सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०६.३० वाजता पोहोचेल. क्रमांक ०७६०३ ही विशेष गाडी २२ ते २९ या कालावधीत दर सोमवारी हुजूर साहेब नांदेड येथून २३.४५ वाजता सुटेल. आणि लोकमान्य टिळक टर्मिनस, मुंबई येथे दुसऱ्या दिवशी १३.४० वाजता पोहोचेल. या गाडींमध्ये प्रथम श्रेणीचा एक वातानुकूलित, द्वितीय श्रेणीचे दोन वातानुकूलित, तृतीय श्रेणीचे सहा वातानुकूलित, सहा शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणीचे असे डबे राहणार आहेत.

ही विशेष रेल्वेगाडी ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, नागरसोल, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परतूर, सेलू, मानवत रोड, परभणी आणि पूर्णा या स्थानकांवर थांबणार आहे.: या विशेष गाडीसाठी आरक्षण २० सप्टेंबर रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर तसेच आयआरसीटीसी डाॅट सीओ डाॅट इन या संकेतस्थळावर सुरू होईल. आरक्षित नसलेल्या डब्यांची तिकिटे यूटीएस द्वारे नोंदणी करता येतील. यासाठी सुपरफास्ट मेल/एक्स्प्रेस गाड्यांप्रमाणेच सामान्य भाडे लागू राहणार आहे.