पुणे : देशातील पर्यटनाला चालना मिळण्यासह दुर्गम भाग हवाई सेवेने जोडण्यासाठी ‘उडान ५.५’ योजनेंतर्गत हेलिकॉप्टर आणि ‘सी-प्लेन’ सुविधा सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. देशातील १५० जलस्थळांबरोबर राज्यातील आठ ठिकाणी ‘एअरो ड्रोम’ (जलाशयातील धावपट्टी) उभारण्याचे नियोजन करण्यात येत असून, त्याबाबत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने (एमएडीसी) याबाबतचा प्रस्ताव भारतीय विमानतळ प्राधिकरण (एएआय) आणि नागरी उड्डाण मंत्रालयाला (एमसीए) दिला आहे.
विमान वाहतूक मंत्रालयाकडून सी-प्लेन ही सुविधा सुरू करण्यासाठी प्राथमिक टप्प्यात केरळ, आंध्र प्रदेश, अंदमान व निकोबार, महाराष्ट्र आणि लक्षद्वीप या ठिकाणांची निवड करण्यात आली आहे. या ठिकाणच्या नद्या, जलाशयातून हवाई वाहतूक केली जाणार आहे. या प्रकल्पासाठी कॅनडामधील ‘डे हविलंड एअरक्राफ्ट ऑफ कॅनडा लिमिटेड’ या कंपनीची विमाने वापरण्यात येणार आहेत.
इंडिगो आणि पवनहंस या कंपन्या देशात सी-प्लेन सेवा सुरू करण्यास इच्छुक आहेत. तर सरकारने कमी व्यवहार्यता अनुदान निधी (गॅप फंडिंग) देण्यास समर्थता दर्शवल्याने या जलवाहतुकीचे शुल्क साधारण दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत असल्याने सामान्य माणसांनाही परवडण्याजोगे आहे. डिसेंबरअखेरपर्यंत या सेवेचा देशभरात विस्तार केला जाईल, अशी माहिती नागरी विमान वाहतूक विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.