पुणे प्रतिनिधी : बीड शहरातील एका खासगी क्लास चालकाने दोन विद्यार्थ्यांनीचा विनयभंग केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार धनंजय मुंडे आणि आमदार संदीप क्षीरसागर या दोघांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहे.
एकूणच घटनेचे पडसाद राज्याच्या विधी मंडळ अधिवेशनात देखील पडल्याचे दिसून आले आहे. या सर्व घडामोडी दरम्यान राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर या पुणे दौर्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी पुणे शहर शहरातील महिलांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक आयोजित केली होती.
बैठकीनंतर विजया रहाटकर यांना बीड येथील घटने प्रकरणी विचारले असता त्या म्हणाल्या, बीड प्रकरणात राष्ट्रीय महिला आयोगाने राज्य महिला आयोगाला लक्ष घालण्यास सांगितले आहे. तसेच समाजातील या विकृतीचा महिलांना अधिक त्रास होतो. त्यामुळे अशा विकृतीला आळा घातला पाहिजे, त्याच बरोबर राजकारणासाठी महिलांचा कोणी ही वापर करू नये, अशा शब्दात राजकीय मंडळींचे त्यांनी कान टोचले.