शहरांच्या दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा समजला जाणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग आता विविध समस्यांच्या विळख्यात सापडू लागला आहे. महामार्ग खड्डेमुक्त व्हावा यासाठी काँक्रिटकरण करण्यात आले होते. मात्र ते ही योग्य रित्या न झाल्याने वाहन चालकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच अपघाताच्या घटना समोर येत आहेत. अवघ्या पाच महिन्यातच दहिसर टोल नाका ते विरार फाटा या दरम्यानच्या हद्दीत ८३ अपघातात ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे हा महामार्ग आहे की मृत्यूचा सापळा असाच काहीसा प्रश्न निर्माण झाला आहे.
वसई विरारच्या भागातून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई, ठाणे, वसई विरार, पालघर, मीरा भाईंदर, यासह गुजरात अशा सर्व भागांना जोडणारा महत्वाचा महामार्ग आहे. एका अर्थाने हा महामार्ग म्हणजे सर्वसामान्य नागरिकांच्या दळणवळणासाठीची जीवनवाहिनी आहे. परंतु आताच्या गतिमानतेच्या युगात या महामार्गाचा विकास, समस्यांवर उपाययोजना यावर फारसे लक्ष दिले जात नाही. याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसू लागला आहे.
अलीकडेच विविध ठिकाणच्या भागात औद्योगिक क्षेत्र विस्तारले आहे. त्यामुळे या महामार्गावरील वाहतूक ही प्रचंड प्रमाणात वाढू लागली आहे. परंतु महामार्गावर मागील काही वर्षांपासून एकापाठोपाठ एक अशा समस्या निर्माण होऊ लागल्या आहेत.या समस्यांचे निराकरण करण्यात प्राधिकरणाला अजून हव्या त्या प्रमाणात यश आले नसल्याचे चित्र दिसून येत आहे.
महामार्गावर यापूर्वी खड्ड्यांची समस्या प्रचंड जाणवत होती.या समस्येतून सुटका व्हावी यासाठी प्राधिकरणाने ६०० कोटी रुपये खर्चून महामार्गाचे काँक्रिटकरण केले. या कामामुळे सुरवातीला वाहनचालकांना गुळगुळीत रस्ते प्रवासासाठी मिळेल अशी आशा होती. परंतु त्या कामात ही नियोजनाचा अभाव असल्याने महामार्गाची स्थिती अत्यंत बिकट बनली आहे. अवघ्या वर्षभरातच काँक्रिटीकरण केलेल्या रस्तावर विविध ठिकाणी खड्डे पडले आहेत. काही ठिकाणी उंच सखल स्थिती निर्माण झाली आहे. तर काही ठिकाणी वाहनांचे टायर्स मार्क तयार होऊन रस्ता प्रचंड खराब झाला असल्याचे चित्र दिसून येत आहे. दहिसर टोल नाका ते विरार फाटा या दरम्यान दोन्ही बाजूच्या वाहिन्यांवर विविध ठिकाणी मोठे टायर मार्क तयार झाले आहेत. अशा रस्त्यावरून दुचाकी चालविणे अत्यंत धोकादायक बनत आहे.
तर दुसरीकडे चारचाकी व अन्य वाहन चालक यांना ही उंच सखल स्थितीमुळे हादरे बसत आहेत. तर महामार्गावर हॉटेल चालक, विकासक, कारखानदार यांच्या वाहनांच्या वाहतूक सोयीच्या दृष्टीने बेकायदेशीर छेद रस्ते तयार झाले आहेत. त्यातूनही अवजड वाहन चालक वाहने काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे वाहनांची धडक लागून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच सहा पदरी असलेल्या महामार्गावर अवजड वाहने ही दोन्ही बाजूच्या तिसऱ्या वाहिनी ( लेन) मध्ये उभी केली जातात. त्यामुळे रस्ता अधिक अरुंद होऊन वाहतुकीला अडथळे निर्माण करणारे ठरत आहेत. त्याकडे खरं तर वाहतूक पोलिसांनी कारवाई करायला हवी, परंतु पोलिसांचे ही याकडे दुर्लक्ष करीत असल्याने वाहनचालक सर्रासपणे वाहने उभी करतात.
तसेच ससूनवघर, मालजीपाडा या भागात आरएमसी, माती भराव वाहनांच्या चाकांना लागून मोठ्या प्रमाणात चिखल रस्त्यावर येतो. अक्षरशः दोन ते तीन किलोमीटर पर्यंतच्या भागात चिखल पसरून महामार्ग निसरडा झालेला असतो त्यावर नियंत्रण मिळविण्यात न आल्याने ही समस्या अजूनही जैसे थे आहे.याशिवाय महामार्गावर संरक्षण जाळ्या नसल्याने आता मुक्या जनावरांचा वावर ही मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे काही वेळा ही मोकाट जनावरे थेट महामार्गावरच ठाण मांडून बसू लागली आहेत. यामुळे भरधाव वेगाने येणाऱ्या वाहन चालकांचा अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
या कारणांमुळे महामार्गावर अपघात होण्याचे प्रकार वाढीस लागत आहे. मागील पाच महिन्यातच महामार्गावर ८३ अपघाताच्या घटना घडल्या त्यात ३१ जणांचा मृत्यू झाला तर ६२ प्रवासी जखमी झाले. या आकडेवारी वरूनच अपघाताची भीषणता लक्षात येत आहे. महामार्गाचे सध्याचे काम पाहता आजारा पेक्षा इलाज भयंकर अशीच काहीशी स्थिती असल्याचा सूर आता नागरिकांमधून उमटू लागला आहे.
खऱ्या अर्थाने समस्या सोडवायच्या असतील ठोस उपाययोजना आखणे गरजेचे असून त्याची वेळोवेळी अंमलबजावणी झाली पाहिजे मात्र दुर्दैवाने प्राधिकरण अजूनही याकडे कानाडोळा करीत असल्याने समस्या कमी होण्याऐवजी त्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. असाच प्रकार सुरू राहीला तर महामार्ग हा मृत्यूचा सापळा बनण्यास वेळ लागणार नाही.
ट्रक टर्मिनलचा अभाव..
वसई पालघर भागातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्गावरून दररोज २५ ते ३० हजार वाहनांचा प्रवास होत असतो त्यापैकी ७० टक्के वाहने ही अवजड मालवाहतूक करणारी आहेत. असे असतानाही पालघर पासून ते वर्सोवा पूल या दरम्यान वाहने उभी करण्यासाठी शासन स्तरावरून ट्रक टर्मिनलचे नियोजन करण्यात आले नाही.वाहने महामार्गावरील मुख्य रस्तावर उभी केली जातात. याचा परिणाम हा महामार्गावरील वाहतुकीवर होत असतो. काही वाहने तर अगदी थेट मुख्य रस्त्याच्या वाहिनीवर उभी केली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या उद्भवते तर काही वेळा वाहने रस्तावर उभी असल्याने भरधाव वेगाने येणाऱ्या वाहनांची धडक लागून अपघात घडतात. ट्रक टर्मिनलचे नियोजन असावे अशी मागणी सातत्याने होते. त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने अडचणी गंभीर बनू लागल्या आहेत.