05 August 2020

News Flash

जीव टांगणीला..

गुरुपौर्णिमेपासून मुंबईमध्ये गोविंदा पथकांची मानवी मनोरे रचण्याची तालीम जोमाने सुरू झाली आहे.

संग्रहित छायाचित्र

प्रसाद रावकर prasad.raokar@expressindia.com

मुंबईकर तरुणांच्या आवडत्या ‘दहीहंडी’त मोठमोठी बक्षिसे लावून राजकीय फायदा घेण्याचा खेळ गेल्या तीन दशकांपासून सुरू झाला; तो न्यायालयीन आदेशांमुळे आटोक्यात आला असला तरी थर लावण्यातला थरार संपलेला नाही.. यंदाही ‘संघभावना’, ‘साहसी खेळ’ म्हणत पुन्हा थर लागणारच आहेत..

गोकुळाष्टमी किंवा कृष्ण-जन्माष्टमीच्या दिवशी मुंबईत साजरा होणारा उत्सव, हा मुंबईकर तरुणाई कशी बदलत गेली याचीही साक्ष देतो. कोणे एकेकाळी याच मुंबईत, गोविंदा पथकांकडून गोकुळाष्टमीला सामाजिक संदेश देणारे, नागरिकांच्या प्रश्नाला वाचा फोडणारे, राजकारण्यांच्या डोळ्यात अंजन घालणारे चित्ररथ काढले जात होते. यातून स्थानिक कलाकारांना हक्काचे व्यासपीठही मिळत होते म्हणतात. दहीहंडीच्या निमित्ताने एकोप्याचे दर्शनही घडत होते. गोपाळकाल्याच्या दिवशी आपापल्याच विभागांत वाद्यांच्या तालावर थिरकत फिरणाऱ्या गोविंदा पथकातील मंडळी सायंकाळी पाच वाजेपर्यंत पांगत, घरी जात. दहीहंडी फोडून भरपूर पैसे ‘छापण्या’चा गोविंदाचा हेतूच नव्हता. केवळ उत्सवाची संस्कृती जपत जन्माष्टमी साजरी होई. ठाण्यातील टेंभी नाक्यावर मोठय़ा बक्षिसाची दहीहंडी हवेत हेलकावे खाऊ लागली आणि मुंबई-ठाण्यातील अनेक गोविंदा पथके त्या स्पर्धेत उतरली. मुंबईमधील काही गोविंदा पथके लाख रुपयांच्या आमिषापोटी ठाण्याकडे कूच करू लागले. ठाण्यात आणखी काही ठिकाणी अशाच मोठय़ा पारितोषिकांच्या दहीहंडय़ांचे आयोजन सुरू झाले आणि लाखमोलाच्या दहीहंडय़ांचे ‘ठाणे’ जिंकण्यासाठी मुंबईकर गोविंदा पथके मध्यरात्रीपर्यंत तिथे जाऊ लागली. रोख रकमाच नव्हे तर सोन्याची नाणी, दुचाकी, मोटरगाडी पारितोषिकाच्या स्वरूपात गोविंदांना खुणावू लागली.

दहीहंडीचा राजकीय फायदा ठाण्यात दिसू लागल्यावर मुंबईतील काही राजकारण्यांनीही मोठय़ा पारितोषिकांच्या हंडय़ा बांधण्यास सुरुवात केली. पण ठाण्याच्या तुलनेत ही पारितोषिके कमीच होती. निवडणुकांचे वर्ष हा गोविंदा पथकांसाठी सुगीचा काळ ठरू लागला. त्या काळी उंच थर रचणाऱ्या गोविंदा पथकांची संख्या फारच कमी होती. मात्र हळूहळू तीही  वाढली. उंच थर रचून भरपूर पैसे मिळतील या आमिषापोटी गल्लीबोळातील लहान गोविंदा पथकेही उंच थर रचण्याचा अट्टहास करू लागल्या आणि थर कोसळून होणाऱ्या अपघातांची संख्या वाढत गेली.

गेल्या तीन दशकांत उंच दहीहंडी फोडण्याची झिंग तरुणांमध्ये भिनली आणि सातव्या, आठव्या, नवव्यासुद्धा थराची हंडी फोडण्याचे प्रयत्न सुरू झाले. उंच थरासाठी लहान मुलांचा मोठय़ा प्रमाणावर वापर सुरू झाला. केवळ एखाद महिन्याचा सराव करून काही मंडळी उंच दहीहंडीला गवसणी घालण्याचा प्रयत्न करू लागली. सुरक्षिततेचे कोणतेही उपाय न करताच एकमेकाच्या खांद्यावर चढताना थर कोसळून मुले जायबंदी झाली, काही तरुणांना कायमचे अपंगत्व आले, तर काहींचा मृत्यू झाला. मृत्युमुखी पडलेल्या वा कायमचे अपंगत्व आलेल्या गोविंदाच्या कुटुंबावर आभाळच कोसळले. सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आल्यानंतर काही मंडळींनी २०१४ मध्ये उंच दहीहंडी आणि थरासाठी होणाऱ्या लहान मुलांच्या वापराविरुद्ध न्यायालयात धाव घेतली. समस्त गोविंदा पथकांना ते रुचले नाही. न्यायालयाने दहीहंडी २० फुटांपर्यंतच बांधण्याचे आदेश दिले. त्याचबरोबर १८ वर्षांखालील मुलांना पथकामध्ये सहभागी होण्यास मनाई केली. दहीहंडी उत्सवाचे आयोजन करणाऱ्या राजकारण्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेत या आदेशांना आव्हान दिले. दोन वर्षे या उत्सवाबाबत संभ्रमच होता. जोगेश्वरीमधील जय जवान गोविंदा पथकाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. पण सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे एक प्रकरण मुंबई उच्च न्यायालयाकडे पाठविले. उच्च न्यायालयाने दहीहंडीच्या उंचीबाबत सरकारने निर्णय घ्यावा असे स्पष्ट केले. त्याच वेळी १४ वर्षांखालील मुलांना थरामध्ये सहभागी करू नये, आयोजकांनी थर रचणाऱ्या गोविंदाच्या सुरक्षिततेची उपाययोजना करावी, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने दिले. मात्र आजतागायत राज्य सरकारने दहीहंडी किती उंच बांधावी याबाबत निर्णयच घेतलेला नाही. त्यामुळे आजही अनेक आयोजक सुरक्षिततेच्या उपाययोजनांना हरताळ फासत आहेत. राज्य सरकारने मध्येच दहीहंडीला साहसी खेळाचा दर्जा दिला. वर्षभर दहीहंडीच्या स्पर्धाचे गाजरही पथकांना दाखवले; ते आजतागायत तरी खोटेच ठरले आहे.

यंदा पुन्हा गुरुपौर्णिमेपासून मुंबईमध्ये गोविंदा पथकांची मानवी मनोरे रचण्याची तालीम जोमाने सुरू झाली आहे. दिवसभर नोकरी आणि रात्री थर रचण्याचा सराव असा गोविंदांचा दिनक्रम सुरू झाला. येत्या २४ ऑगस्ट रोजी जन्माष्टमीच्या दिवशी उंच दहीहंडी फोडून मानकरी होण्याची मनीषा अनेक पथकांनी बाळगली आहे. त्या दृष्टीने त्यांचा सरावही सुरू आहे. मात्र सुरक्षिततेचा प्रश्न आजही ऐरणीवरच आहे.

खासगी कंपनीत नोकरी करून आपल्या कुटुंबाचा चरितार्थ चालविणारा तरुण कमलेश भोईर. यंग उमरखाडी गोविंदा पथकातील या तरुणाची कबड्डी आणि दहीहंडी ही मर्मस्थाने. ‘दहीहंडी उत्सवाची संस्कृती जपायला हवी आणि नवी आव्हानेही पेलायला हवीत, पण त्याच वेळी गोविंदांच्या सुरक्षिततेकडेही लक्ष द्यायला हवे. सराव करणाऱ्या गोविंदा पथकांनीच आपली क्षमता ओळखून थर रचायला हवेत. अन्यथा उत्सवाला गालबोट लागू शकेल. पारितोषिकांच्या रकमांची पडझड सुरू झाल्याने पथकांचे आर्थिक गणित बिघडू लागले आहे. त्यातच आयोजकांची संख्याही कमी होऊ लागली आहे. हे नवे प्रश्न आता पथकांना भेडसावत आहेत,’ अशी खंत कमलेश भोईरने व्यक्त केली.

सत्तरच्या दशकात मुंबईत सर्वप्रथम सहा थर रचणाऱ्या डिलाईल रोडवरील बीडीडी चाळीतील बडय़ा-मारुती गोविंदा पथकाचे सर्वाना कौतुक होते. या पथकाने सामाजिक बांधिलकी आणि सुरक्षिततेचे भान राखत दोन पावले मागे घेतली आहेत. बीडीडी चाळीत राहणारा पथकातील गणेश सपाटे मोजक्या शब्दांत बरेच काही सांगून गेला. या पथकात सहभागी होणारे तरुण मूळचे कबड्डीपटू. कबड्डीत नाव कमविण्याचे स्वप्न प्रत्येकाने मनाशी बाळगले आहे. आम्हीही सात थर रचण्यास सुरुवात केली होती. ‘पथकातील तरुण जायबंदी झाल्यास त्याला कबड्डीला कायमचा रामराम ठोकावा लागेल. त्यामुळे उंच दहीहंडीच्या स्पर्धेत सहभागीच होत नाही,’ असा निर्धार गणेश सपाटे याने व्यक्त केला. हा उत्सव लोकांची करमणूक बनला आहे. पण गोविंदांसाठी जिवावरचा खेळ बनला आहे. त्यामुळे केवळ संस्कृती जपण्यासाठीच आता हा उत्सव साजरा करण्याचा आमचा उद्देश आहे, असेही गणेश सांगतो.

तर, ‘‘एकेकाळी चित्ररथासोबत थिरकत गोविंदा पथक गिरगाव आणि आसपासच्या भागात फिरायचो. पण आता चित्ररथ काळाच्या पडद्याआड गेले. उंच दहीहंडी हेच पथकांचे उद्दिष्ट बनले. त्यामुळे गुरुपौर्णिमेपासून नित्यनियमाने सराव करून जन्माष्टमीला दहीहंडी फोडण्याचा आनंद काही वेगळाच. या उत्सवाने तरुणांमध्ये संघभावना जोपासली जाते. भविष्यात तीच मोलाची ठरते,’’ असे गिरगावमधील अखिल खोताची वाडी सार्वजनिक दहीकाला उत्सव मंडळातील गोविंदा सतीश फटकरे यांचे म्हणणे आहे.

‘‘हा रांगडय़ा तरुणांचा उत्सव. सराव महत्त्वाचा. त्यासाठी नित्यनियमाने व्यायाम करणेही गरजेचे. हेच ओळखून आम्ही व्यायामशाळा सुरू करून तरुणांना एक नवे दालन उपलब्ध केले.’’ – असे आवर्जून सांगणारे गिरगावच्या मंगलवाडीतील जरीमरी गोविंदा पथकातील राजेंद्र शिंदे म्हणतात, ‘‘उत्सवाचे स्वरूप बदलल्याने आमच्या पथकानेही महत्त्वाचे बदल केले. व्यायाम आणि सराव न करणाऱ्याला थरात स्थान नाही असा पथकाचा दंडकच आहे. उत्सवाची संस्कृती जपताना, सुरक्षिततेचीही काळजी घेणे गरजेचे आहे.’’

उंच दहीहंडीमुळे वाढलेले धोके, होणारे अपघात, थरामध्ये लहान मुलांचा समावेश आदींमुळे अस्वस्थ झालेल्या अ‍ॅड. स्वाती पाटील यांनी न्यायालयात धाव घेऊन काही निर्बंध घालण्याची विनंती केली होती. उंच दहीहंडी फोडण्याचे साहस तरुणांना करावेसे वाटते. त्यांना विचारले असता, ‘असे धाडस करण्यापूर्वी तरुणांनी आपले आई-वडील आणि कुटुंबाचा विचार करायला हवा. मर्यादा पाळल्या तर उत्सवाचाही आनंद लुटता येईल आणि धोकाही टळेल’, अशी कळकळीची विनंती अ‍ॅड. स्वाती पाटील यांनी समस्त गोविंदा पथकांना केली आहे.. पण यंदाही जीव टांगणीला लावणारा हा ‘खेळ’ सुरूच राहणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 25, 2019 1:23 am

Web Title: height of dahi handi pyramid restriction for dahi handi human pyramids zws 70
Next Stories
1 विद्यापीठात जात असताना..
2 ‘पुढच्यास ठेचे’नंतर मागचे..
3 अच्छा, समाजसेवा करता काय?
Just Now!
X