उज्जैनला राहणारा दहावीतला १६ वर्षांचा प्रियांशु यादव. उत्तम मेकअप आर्टिस्ट. विशेषतः महिलांचा मेकअप ही त्यांची खासियत होती. तरुणींसाठीचा मेकअप लूक तो स्वतःवर करत असे आणि त्याचे व्हिडीओज इंस्टाग्रामवर अपलोड करत असे. तुम्ही जर त्याचे रील्स बघितले तर अचंबित व्हाल इतका मेकअपचा सफाईदार हात त्याचा होता. पण मुलगा असून मुलींचे मेकअप लुक्स करतो म्हणून इन्स्टावर त्याला प्रचंड ट्रोल करण्यात आलं. त्यातून नैराश्य येऊन त्याने आत्महत्या केली.
स्त्रीवेश आणि मेकअप केल्याबद्दल एका १६ वर्षांच्या मुलाला नैराश्य येईपर्यंत ट्रोल केलं जावं हेही सोशल मीडियाचं वास्तव आहे आणि आपल्या वयात येणाऱ्या मुलांना हे माहित असलं पाहिजे. माणसांच्या मनाचे, व्यक्तिमत्वाचे लचके तोडणारी माणसं इथे भरपूर प्रमाणात आहेत आणि आपण एका लहान मुलाला ट्रोल करतोय याचं भान न राखता अमानुष पद्धतीने लिहिणारे अनेक जण आहेत. प्रियांशूच्या बाबतीत नक्की काय झालं, कुणी त्याला इतकं प्रचंड ट्रोल केली याचा तपास पोलीस करत आहेत पण मुद्दा आहे तो सायबर स्पेस आपल्या मुलांसाठी सुरक्षित असण्याचा, त्यांना अगदी कोवळ्या वयातही प्रचंड ट्रोल केलं जाऊ शकतं हे माहिती असण्याचा आणि अशावेळी काय आणि कुठे मदत मिळू शकते हे माहिती असण्याचा.
हेही वाचा : ‘झिम्मा २’ मधील लाडक्या पात्राला पार्किनसन्स होताच.. पण ‘हा’ आजार नेमका आहे काय? उपचार, लक्षणे व परिणाम वाचा
ट्रोलिंग म्हणजे काय?
टीका आणि ट्रोलिंग यात पुसटशी रेष असते. टीका कधी ट्रोलिंगमध्ये बदलेल सांगता येत नाही. त्यामुळे लिहिणाऱ्याने किती भान राखलेलं आहे त्यावर हे अवलंबून असतं. एखाद्या व्यक्तीचे विचार पटले नाहीत, त्याचा लूक आवडला नाही, पोस्ट आवडली नाही, फोटो आवडला नाही अशा कुठल्याही कारणाने समोरच्या व्यक्तीला वाट्टेल ते बोलणं, असभ्य भाषेत बोलणं, धमकावणं, शारीरिक इजा करण्याबद्दल लिहिणं, आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं असे सगळे प्रकार ट्रोलिंगमध्ये येतात. ट्रोल्स सतत एखाद्याला जाणूनबुजून लक्ष्य करतात. पुन्हा पुन्हा त्यांच्या प्रोफाईल्सवर जाऊन काहीबाही लिहितात. दुसऱ्याला त्रास देण्यात, दुसऱ्याचा अपमान करण्यात, धमकावण्यात त्यांना मजा येते. लोकांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी प्रक्षोभक आणि द्वेषयुक्त शेरेबाजी केली जाते.
एखाद्या वादामध्ये शब्दांची आणि अभिव्यक्तीची, सभ्यतेची मर्यादा ओलांडलेली नसते त्या चर्चेला, टीकेला ट्रोलिंग म्हणता येत नाही पण जिथे समोरच्या व्यक्तीला जाणीवपूर्वक त्रास देण्याचा, नामोहरम करण्याचा, शारीरिक आणि मानसिक इजा पोहोचवण्याचा, लैंगिक छळ करण्याचा, बदनामीचा हेतू असतो त्याला ट्रोलिंग म्हटलं जातं.
हेही वाचा : दररोज आहारात टोमॅटोचा वापर केल्यास त्याचा तुमच्या शरीरावर काय परिणाम होतो? डॉक्टर म्हणाले, “धोका…”
माणसं ट्रोलिंग का करतात? याची अनेक मनोसामाजिक कारणे आहेत. एका ठिकाणचा राग दुसऱ्या ठिकाणी काढण्यासाठी सोशल मीडिया हे अतिशय सोपं माध्यम आहे. पूर्वग्रहांना सोशल मीडियावर सहज खतपाणी मिळतं. त्यातून आपल्यापेक्षा वेगळा विचार समजून घेण्याची, निदान ऐकण्याचीही तयारी हळूहळू नष्ट होत जाते आणि आपण जो विचार करतो तोच फक्त बरोबर आहे, आणि बाकी सगळे मूर्ख आहेत असं वाटायला लागतं. शिवाय ट्रोलिंग ही शाब्दिक मारामारी असल्याने ती करणे अनेकांना सोपे वाटते. पण शब्द शस्त्राइतकेच धारदार वार करु शकतात हे अनेकांच्या लक्षात येत नाही. स्वतः ट्रोल झाले की त्यांच्या ते लक्षात येतं पण तोवर उशीर झालेला असतो. ज्यावेळी माणसं ऑनलाईन जगात असतात काही माणसांमध्ये ‘डीसइन्हिबिशन इफेक्ट’ दिसायला लागतो. म्हणजेच अशा माणसांना कशाचे काहीही वाटेनासे होते. एरव्ही वावरताना भावनांची एक अदृश्य भिंती आपण स्वतःभोवती उभी केलेली असते. ही भिंत आपले निरनिराळ्या संदर्भात रक्षण करत असते. हे कवच ऑनलाईन जगतात पाऊल ठेवल्याबरोबर ही माणसे काढून टाकतात आणि मनाला येईल तसे वागायला सुरुवात करतात. नॉटिंगहॅम ट्रेंट विद्यापीठातील प्रो. मार्क ग्रिफिथ्स अशा ट्रोल्सच्या प्रकाराला नाव दिलंय डीसइन्हिबिशन इफेक्ट. ते म्हणतात, “अशा माणसांचा समज असतो की आपण कुणाशीही कशाही भाषेत बोललो तरी चालतं. प्रत्यक्षात वागणार नाही असं ही माणसे वागायला सुरुवात करतात. कारण आपल्या वर्तनाबद्दल त्यांच्या मनात कसलीही लाज लज्जा उरत नाही. एखादी गोष्ट करावी अगर नाही याबद्दल आपलं मन आपल्याला जे काही सांगत असतं ते या लोकांना ऐकू येईनासं होतं. माणसं एकटी असतात तेव्हा वेगळी असतात आणि समूहात वेगळी होतात.”
मुलांचं ट्रोलिंग होत असेल तर काय केलं पाहिजे?
१) अनेकदा आपल्याला ऑनलाईन जगात कुणी त्रास देतंय हे मुलं सांगत नाहीत. पण त्यांचं वर्तन बदलतं. ते चिडचिडे होतात, एकलकोंडे होतात. काहीवेळा स्वतःला इजा करून घेण्याचा प्रयन्त करतात. त्यांना नैराश्य आलेले असू शकते. त्यामुळे मुलांच्या वर्तनात जर अचानक बदल झाला असेल तर मुलांशी बोललं पाहिजे. समुपदेशकांची मदत घेतली पाहिजे.
२) ट्रोल्सच्या विरोधात पोलिसात तक्रार नोंदवता येते हे मुलांना माहिती हवं. आपल्याला जर ऑनलाईन जगात कुणी त्रास दिला तर पोलिसांची मदत घ्यायला हवी हे मुलांना माहिती असल्यानेही अनेकदा फरक पडतो.
३) ऑनलाईन जगात विनाकारण माणसं एकमेकांना त्रास देतात हेही मुलांना माहिती असलं पाहिजे. म्हणजे कुणाशी मैत्री करायची, कुणाशी टाळायची, कुठल्या पोस्ट पब्लिक करायच्या, कुठल्या नाही याचे निर्णय मुलं घेऊ शकतात.
४) मुलांना लहान वयात म्हणजे वयाच्या चौदा-पंधरा वर्षांच्या आधी सोशल मीडिया देता कामा नये. त्यांनी चोरीछुपे अकाउंट बनवलेलं नाहीये ना हेही बघितलं पाहिजे, त्यासाठी पालकांचा मुलांशी सजग संवाद हवा.