मुंबई : राज्यात दिवसेंदिवस करोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून शनिवारी ५३ नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे रुग्णांची संख्या १ हजार ९६७ वर पोहोचली आहे. मुंबईतील रुग्णांची संख्या ८२९ इतकी झाली आहे. तसेच राज्यामध्ये शनिवारी करोनामुळे दोघांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांची संख्या २७ वर पोहोचली आहे. हे दोन मृत्यू नागपूरमध्ये झाले आहेत.

राज्यामध्ये शनिवारी सापडलेल्या ५३ रुग्णांमध्ये मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत २४ रुग्ण सापडले. त्याखालोखाल पुणे महानगरपालिकेच्या हद्दीत ११, ठाणे महानगरपालिका हद्दीत ५, पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीत ३, पुणे, सांगली जिल्हा, सांगली महानगरपालिका, नागपूर महानगरपालिकेच्या हद्दीत प्रत्येकी २, रायगड आणि नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

राज्यामध्ये शनिवारी दोन रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हे दोन्ही मृत्यू नागपूरमधील असून एक रुग्ण ३२ वर्षाचा तर दुसरा ५६ वर्षाचा आहे. या मृत्यूमुळे राज्यातील मृतांची संख्या २७ वर पोहचली आहे. जानेवारी २०२५ पासून राज्यात एकूण २१ हजार ६७ करोना चाचण्या करण्यात आल्या असून त्यापैकी १ हजार ९६७ जण बाधित आढळले. आतापर्यंत १३६२ रुग्ण पूर्णपणे बरे झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ६९.२४ टक्के इतके आहे. राज्यामध्ये सध्या ५७८ रुग्ण सक्रिय आहेत. सध्या असलेल्या सक्रिय रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे असल्याने ते घरीच उपचार घेत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.