मुंबई : मुंबईसह राज्यभरात सध्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. प्रामुख्याने कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचे प्रमाण अधिक आहे. त्या तुलनेत उर्वरित भागात अधूनमधून पाऊस पडत आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस कोकण, तसेच घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तर इतर भागात ढगाळ वातावरणासह हलक्या पावसाची शक्यता आहे.
गेले काही दिवस पावसाने संपूर्ण राज्यात विश्रांती घेतली आहे. पाऊस पडत असला तरी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी बरसत आहेत. कोकण आणि घाटमाथा वगळता इतर भागात मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. दरम्यान, पुढील तीन ते चार दिवस कोकणासह घाटमाथ्यावर पावसाचा जोर राहील अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मुंबई शहर, तसेच उपनगरात शुक्रवारी सकाळपासून पावसाने हजेरी लावली होती. अनेक भागात पावसाची रिपरिप सुरू होती. तर काही भागात जोरदार वाऱ्यासह पाऊस पडत होता.
हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ५.३० दरम्यान १२.४ मिमी, तर सांताक्रूझ केंद्रात ७.१ मिमी पावसाची नोंद झाली. मुंबईत पावसाचा जोर रविवारपर्यंत कायम राहणार असल्याचा अंदाज आहे. ठाणे भागातही शुक्रवारी सकाळपासून संततधार पाऊस पडत होता. कोकण, घाटमाथ्यावर पावसाचा जोर असला तरी राज्यातील इतर भागात मात्र पावसाचे प्रमाण कमी राहील.
राज्यातील पावसाची स्थिती
कोकण, घाटमाथा वगळता इतर भागात पावसाचा जोर फारसा नसेल. अधूनमधून हलक्या सरी बरसतील. मात्र, पावसाचे प्रमाण तुलनेने कमी असेल. मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात हलक्या सरी बरसतील. तर विदर्भात ढगाळ वातावरण असले तरी पाऊस फारसा पडणार नाही अशी शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पावसाचा अंदाज कुठे
अतिमुसळधार पाऊस
पालघर, धुळे, नंदुरबार, नाशिक घाट परिसर
हलक्या ते मध्यम सरी
मुंबई , ठाणे, नाशिक, रायगड, जळगाव</p>
ढगाळ वातावरण
विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र
ला-निना स्थिती
प्रशांत महासागराच्या विषुववृत्तीय भागात सध्या सर्वसाधारण स्थिती (एन्सो न्यूट्रल) आहे. नैऋत्य मोसमी पावसाचा हंगाम अखेरच्या टप्प्यात येताच प्रशांत महासागरात ‘ला-निना’ स्थिती तयार होण्याची शक्यता आहे. ईशान्य मान्सून आणि हिवाळ्यात ‘ला-निना’चा प्रभाव राहू शकेल. इंडियन ओशन डायपोल (आयओडी) सर्वसाधारण पातळीवर असून, मान्सून अखेरीस ‘आयओडी’ ऋण (निगेटिव्ह) होण्याचा अंदाज आहे.