मुंबई : राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. पुढील काही दिवस राज्यात पावसाचे प्रमाण कमी राहणार आहे. मात्र, विदर्भात काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. पुढील तीन – चार दिवस विदर्भात पावसाची शक्यता आहे.

गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाचा जोर कमी झाला आहे. काही भागात अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात मुसळधार पावसाची शक्यता नाही. मात्र विदर्भात पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या कालावधीत काही भागात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यानंतर राज्यात पाऊस पुन्हा सक्रिय होईल. त्यानंतर पावसाचा जोर कायम राहील.

कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण अधिक राहील. याचबरोबर महिन्याच्या अखेरीस संपूर्ण राज्यात पावसाचा जोर राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मोसमी पावसाच्या दुसऱ्या टप्प्यातील अंदाजानुसार ऑगस्ट महिन्यात सरासरी इतका पाऊस पडेल असे हवामान विभागाने सांगितले.

पावसाचा अंदाज कुठे

मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज
भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा

हलक्या सरींचा अंदाज
कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, रत्नागिरी, रायगड

नागपूरमध्ये सर्वाधिक तापमान

गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. नागपूर येथे शनिवारी सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली. तेथे ३४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मागील काही दिवस पावसामुळे येथील तापमान सरासरी इतके होते. मात्र, पावसाने ओढ दिल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे.