मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सध्या उकाडा आणि उन्हाचा ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, संपूर्ण राज्यात शनिवारपासून पुढचे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. दक्षिण ओडिशाच्या व आंध्र प्रदेशच्या उत्तरेकडील बंगालच्या उपसागरात शुक्रवारी सकाळी कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. पुढील दोन दिवसांत ते पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. परिणामी महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात उत्तर कोकणात शनिवार ते सोमवार या कालावधीत मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान, गेले काही दिवस पावसाने उघडीप दिल्याने तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे उन्हाचा तडाखा सहन करावा लागत आहे. मध्येच ढगाळ वातावरण तर मध्येच ऊन अशा वातावरणाला सध्या नागरिकांना तोंड द्यावे लागत आहे. त्यामुळे पाऊस पडल्यास काहीसा दिलासा मिळेल. मागील तीन दिवसांत राज्यात कमाल तापमानात वाढ दिसून आली. त्या तुलनेत शुक्रवारी तापमानात फारशी वाढ झालेली नाही.

मुंबईच्या तापमानात घट

मुंबईच्या तापमानात मागील काही दिवस वाढ झाल्याचे निदर्शनास आले. साधारण ३० ते ३१ अंश सेल्सिअस दरम्यान तापमानाचा पारा होता. त्या तुलनेत शुक्रवारी मुंबईच्या कमाल तापमानात घट झाली होती. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात शुक्रवारी २९.७ अंश सेल्सिअस, तर सांताक्रूझ केंद्रात २९.५ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदले गेले. मात्र, आर्द्रता अधिक असल्याने उकाडा कायम आहे.

नवी मुंबई, ठाण्यात मुसळधार

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने नवी मुंबई परिसरातील पनवेल, खारघर, बेलापूरसह ठाणे शहर आणि परिसरात हजेरी लावली. अनेक दिवसांनी पडलेल्या मुसळधार पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला.

रविवारी अतिमुसळधार पावसाचा अंदाज

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजनुसार, रविवारी मुंबईसह ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या कालावधीत काही भागात सर्वाधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर पुणे, अहिल्यानगर, कोल्हापूर घाट परिसर, सांगली, छत्रपती संभाजीनगर, परभणी, बीड, जालना या जिल्ह्यात शनिवारपासून पुढील दोन ते तीन दिवस मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे.