नागपूर : राज्यातील अधिकांश जिल्ह्यांमध्ये गेल्या चार दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. अनेक भागांमध्ये “रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट” देण्यात आला. आज रविवारी देखील अधिकांश भागात मुसळधारेचा अंदाज असून सोमवारपासून काही भागात पावसाचा जोर काही ठिकाणी कमी होईल.
मागील चार दिवसांपासून राज्यभरात पावसाचा जोर कायम आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये संततधार सुरु असून, काही ठिकाणी मुसळधार पावसामुळे मोठा परिणाम केला आहे. मात्र, आज रविवारी राज्यात पावसाची तीव्रता काहीशी कमी होण्याचा अंदाज असला तरी अधिकांश ठिकाणी मुसळधारेचा देखील अंदाज हवामान खात्याने व्यक्त केला आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाला सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. सोमवारपासून राज्यात पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. सोमवारी आणि मंगळवारी रत्नागिरी आणि रायगड तसेच सातारा आणि पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात ढगाळ वातावरण राहील आणि काही ठिकाणी हलक्या सरी कोसळतील, अशी शक्यता हवामान विभागाने वर्तविली.
विदर्भात काय इशारा
विदर्भातील अकोला, अमरावती आणि बुलढाणा जिल्ह्यांत विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
मुसळधार पाऊस कुठे
पुणे, सातारा, कोल्हापूर, सांगली व सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम पावसाची शक्यता आहे. मात्र पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यावर मुसळधार ते अतिमुसळधार सरींचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या भागांसाठी “ऑरेंज अलर्ट” देण्यात आला आहे, तर कोल्हापूरच्या घाट परिसरात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रात मध्यम
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, परभणी व जालना जिल्ह्यांमध्ये वाऱ्याचसह मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. बीड, नांदेड, हिंगोली, लातूर आणि धाराशिव येथे हलक्या पावसाचा अंदाज आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतही हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, नाशिकच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाचा इशारा देत यलो अलर्ट दिला आहे.
मुंबई व कोकणला “येलो अलर्ट”
मुंबईसह कोकणातील पालघर, ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर या जिल्ह्यांमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. रायगड जिल्ह्यात मात्र अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.