मुंबई : राज्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच असून मराठवाडय़ासह मध्य महाराष्ट्र आणि कोकणात काही ठिकाणी अतिवृष्टी झाली. त्यामुळे पिकांचेही नुकसान झाले. दरम्यान, पुढील दोन ते तीन दिवस राज्यात सर्वदूर मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्याच्या विविध भागांत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. कमी दाबाच्या क्षेत्राने त्यात भर घातली आहे. विदर्भावर निर्माण झालेल्या कमी दाब क्षेत्रामुळे सध्या राज्यात पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा पहिला फटका मराठवाडय़ाला बसला. त्यापाठोपाठ सोलापूर, सांगलीसह मध्य महाराष्ट्रातील इतर जिल्ह्य़ांमध्येही अतिवृष्टी झाली.

कोकणातही अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस झाला. पुणे शहर आणि परिसरातही रविवारपासून पावसाचा जोर वाढला आहे. कोल्हापूर आणि महाबळेश्वर परिसरांतही पाऊस कायम होता.

सध्या मोसमी पावसाच्या परतीचा प्रवास सुरू आहे, मात्र राज्यात सध्या कमी दाबाच्या क्षेत्राचा परिणाम होत आहे. विदर्भावर निर्माण झालेले कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता आता कमी होण्याचा अंदाज असला, तरी त्यामुळे राज्यात काही ठिकाणी अतिवृष्टीचा अंदाज आहे.

१६६ मंडळात अतिवृष्टी

राज्याच्या १३ जिल्ह्यांतील १६६ मंडळात सोमवारी अतिवृष्टी झाली. रायगड, पुणे, सातारा, सोलापूर, बीड जिल्हयात अनेक ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली. खडकवासल्याबरोबरच इतर काही धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली आहे.

रायगडमधील अलिबाग, चरी, चौल, नागाव, पनेवल तालुक्यातील पोयंजे, खालापूरमधील चौक, वसांबे, पेण तालुक्यामधील वाशी, महाड तालुक्यातील महाड, बिरवाडी, कारंजवाडी, नाटे, खारवली, तुडील, मांघरुण, माणगाव तालुक्यातील माणगाव, इंदपूर, गोरेगाव, लोणेरे, निझामपूर या मंडळात अतिवृष्टी झाली. याचबरोबर सोलापूर, बीड जिल्ह्यातील काही भागात अतिवृष्टीची नोंद झाली.

शुक्रवारपर्यंत जोर कायम

हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार, शुक्रवारपर्यंत राज्यात विविध ठिकाणी पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पुढील दोन दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, पालघर, कोल्हापूर, सातारा जिल्ह्य़ांतही तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.