नागपूर : गेल्या आठवड्यात पावसाने राज्यातील अधिकांश भागात विश्रांती घेतली. आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. भारतीय हवामान खात्याने राज्यात मान्सून सक्रिय होत असल्याचे संकेत दिले आहे. राज्यातील अधिकांश जिल्ह्यात आजपासून २५ जुलै पर्यंत जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे.
राज्यात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ३५ अंशाच्या जवळ पोहोचला आहे. अशातच आता हवामान खात्याने पुन्हा एकदा पाऊस सक्रिय होत असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळणार आहे. हवेचा दाब कमी झाल्याने पावसासाठी पोषक वातावरण निर्माण झाले असून, सर्वाधिक जोर कोकण आणि विदर्भात राहणार आहे.
आज, २० जुलैला कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यांवर जोरदार सरींची शक्यता आहे. तसेच कोकणातील ठाणे, रायगड, मध्य महाराष्ट्रातील पुण्याचा घाटमाथा, सातारा, सांगली, पूर्व कोल्हापूर, सोलापूर, मराठवाड्यातील धाराशिव, लातूर आणि विदर्भातील सर्वच जिल्ह्यात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच कोकणासह मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याच्या दक्षिणेकडील जिल्ह्यात आणि विदर्भात विजांसह पावसाची शक्यता असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. उर्वरित राज्यात विजांसह हलक्या सरींची शक्यता आहे.
राजस्थानमध्ये तीव्र कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असून, ही प्रणाली निवळण्याची शक्यता आहे. मान्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा त्याच्या सर्वसाधारण स्थितीवर असून, राजस्थानमधील कमी दाबाच्या केंद्रापासून फतेहगड, मुजफ्फराबाद, बंकुरा ते ईशान्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे. उत्तर बंगालच्या उपसागरात २४ जुलैपर्यंत कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. शनिवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस कोसळला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे सर्वाधिक १४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी कोसळल्या आहेत.
ऑरेंज अलर्ट कुठे?
२२आणि २३ जुलैला कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि साताऱ्याच्या घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता आहे.
यलो अलर्ट कुठे?
पालघर, ठाणे, पुणे घाट, लातूर, धाराशिव, तसेच विदर्भातील अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीसह सर्व जिल्ह्यांमध्ये २० ते २५ जुलैदरम्यान विविध दिवशी मध्यम स्वरूपाच्या पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.