Mumbai Maharashtra News Today : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे. यानिमित्त किल्ले शिवनेरी येथे मोठ्या दिमाखदार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. तसेच राज्यभरात ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या कार्यक्रमांविषयीच्या बातम्यांवर आपलं लक्ष असेल. तसेच राज्यात मराठा आरक्षणाचा विषय तापला आहे. यासंबंधीच्या बातम्या वाचकांना इथे वाचायला मिळतील.

Live Updates

Maharashtra News Today, 19 February 2024 : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा एकाच क्लिकवर.

19:29 (IST) 19 Feb 2024
पुणे : शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण, पोलिसांकडून सुखरूप सुटका; अपहरण करणाऱ्यांचा शोध सुरू

पुणे : भारती विद्यापीठ परिसरामधून एका शाळकरी मुलाचे ५० लाखांच्या खंडणीसाठी अपहरण करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने तपास करून मुलाची सुटका केली.

सविस्तर वाचा…

19:28 (IST) 19 Feb 2024
मिरा रोड मध्ये येणाऱ्या वारीस पठाण यांना पोलीस आयुक्तालयाने दहिसर मध्येच रोखले

भाईंदर : मिरा रोड येथे पोलीस आयुक्तांना आणि राजकीय पुढाऱ्यांना भेटण्यासाठी येणाऱ्या वारीस पठाण यांना पोलिसांनी शहराच्या वेशीवरच रोखून परत पाठवले आहे.

सविस्तर वाचा…

18:02 (IST) 19 Feb 2024
मोतीबिंदू शस्त्रक्रिया आता मोफत! राज्याच्या आरोग्य विभागाच्या मोहिमेबद्दल जाणून घ्या…

पुणे : राष्ट्रीय अंधत्व व दृष्टी क्षीणता नियंत्रण कार्यक्रमांतर्गत राज्यभरात आजपासून (१९ फेब्रुवारी) ४ मार्चपर्यंत विशेष मोतीबिंदू शस्त्रक्रिया मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेत १ लाख रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचे उद्दिष्ट सार्वजनिक आरोग्य विभागाने ठेवले आहे.

सविस्तर वाचा…

18:01 (IST) 19 Feb 2024
अमरावती : धक्कादायक! युवकाने भररस्‍त्‍यात स्‍वत:ला पेटवून घेतले…

अमरावती : शहरातील वर्दळीच्‍या एका चौकात एक युवक हाती एक बाटली घेऊन येतो. काहीही न बोलता शांतपणे अंगावर पेट्रोल ओतून घेतो. लोकांना काही कळण्‍याआधीच तो स्‍वत:ला पेटवून घेतो. क्षणात तो होरपळून जातो.

सविस्तर वाचा…

17:40 (IST) 19 Feb 2024
सांगली : कृष्णा प्रदुषणाबद्दल महापालिकेला ९० कोटीचा दंड

सांगली : प्रक्रिया न करता सांडपाणी सोडून कृष्णा नदी प्रदुषित केल्याबद्दल सांगली महापालिकेला ९० कोटी रूपयांचा दंड प्रदुषण नियंत्रण मंडळाने ठोठावला असल्याची माहिती अ‍ॅड. ओंकार वांगीकर, सुनील फराटे व तानाजी रूईकर यांनी सोमवारी पत्रकार बैठकीत दिली.

वाचा सविस्तर…

17:37 (IST) 19 Feb 2024
वाशिम : अबब! एकाच मंडपात तब्बल २६ वधू-वर विवाहबद्ध

वाशिम : लग्नावर होणारा अवाजवी खर्च टाळून मालेगाव तालुक्यातील शिरपूर जैन येथे गवळी समाजाच्या वतीने रविवारी, १८ फेब्रुवारीला सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सामुहिक विवाह सोहळ्यामध्ये एकाच मंडपात अवघ्या ३० ते ३५ मिनिटात २६ जोडप्यांचा विवाह सोहळा पार पडला.

सविस्तर वाचा…

17:37 (IST) 19 Feb 2024
समाज माध्यमावर पोस्ट केली म्हणून परीक्षेत सहभागी होऊ दिले नाही, उच्च न्यायालय म्हणाले…

नागपूर : वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालयाच्या विद्यार्थ्याला विश्वविद्यालयाविरोधात समाज माध्यमावर पोस्ट टाकणे चांगलेच अंगलट आले आहे. विश्वविद्यालयाने बडतर्फ केल्याने परिक्षेपासून मुकण्याची वेळ आल्याने विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

सविस्तर वाचा…

17:36 (IST) 19 Feb 2024
रणजी ट्रॉफी : विदर्भाचा हरियाणावर ११५ धावांनी विजय, ‘या’ आंतरराष्ट्रीय खेळाडूला निरोप…

नागपूर : नागपूरच्या विदर्भ क्रिकेट संघाच्या मैदानावर झालेल्या रणजी सामन्यात विदर्भाच्या संघाने हरयाणाचा ११५ धावांनी पराभव केला. विदर्भ संघासाठी दीड दशकाहून अधिक काळापासून फलंदाजीचा कणा असलेला व संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार फैज फजलने रविवारी देशांतर्गत क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती.

सविस्तर वाचा…

16:59 (IST) 19 Feb 2024
शरद पवारांच्या पक्षाच्या नवीन नावाबाबत सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्देश; म्हणाले, “निवडणूक आयोगाचा ७ फेब्रुवारीचा निर्णय…”

शरद पवार यांना त्यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याचा अधिकार देणारा निवडणूक आयोगाचा ७ फेब्रुवारीचा आदेश कायम राहील, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. शरद पवार नवीन चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात. तसेच अर्ज केल्यानंतर एका आठवड्याच्या आत त्याची नोंद करणे आवश्यक आहे.

16:55 (IST) 19 Feb 2024
बावनकुळे म्हणतात, “कुणी सोबत येत असेल तर भाजपचा दुपट्टा तयार, राहुल गांधी…”

नागपूर : पंतप्रधान मोदींनी देशाला विकसित भारताची गॅरंटी  दिली आहे. त्यामुळे राहुल गांधी जिथे यात्रा काढतील तिकडे त्यांना मोदी आणि भाजपचा जयघोष पाहायला आणि ऐकायला मिळेल, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

सविस्तर वाचा…

16:52 (IST) 19 Feb 2024
पुढील आदेशांपर्यंत शरद पवार गटाला दिलेलं नाव कायम राहणार : सर्वोच्च न्यायालय

शरद पवार यांना त्यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार हे नाव वापरण्याचा अधिकार देणारा निवडणूक आयोगाचा ७ फेब्रुवारीचा आदेश कायम राहील, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. शरद पवार नवीन चिन्हासाठी निवडणूक आयोगाकडे जाऊ शकतात. तसेच अर्ज केल्यानंतर एका आठवड्याच्या आत त्याची नोंद करणे आवश्यक आहे.

16:49 (IST) 19 Feb 2024
कल्याणमध्ये क्रिकेट खेळण्यावरून विद्यार्थ्याला मारहाण

कल्याण : क्रिकेट स्पर्धा महाविद्यालयाच्या आहेत. आरोपी हा महाविद्यालयात विद्यार्थी नसताना, तो दुसऱ्या गटाकडून का क्रिकेट खेळत आहे, असा प्रश्न एका तरूणाने उपस्थित केला. या वादातून एका महाविद्यालयीन विद्यार्थ्याला बनावट महाविद्यालयीन विद्यार्थी म्हणून खेळणाऱ्या तरुणाने बेदम मारहाण केली.

वाचा सविस्तर…

16:48 (IST) 19 Feb 2024
धक्कादायक : सोमवार पेठेतील गुंडाकडून साडेतीन कोटीचे मेफेड्रोन जप्त; पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे : पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई करून साडेतीन कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त केले. या प्रकरणी सोमवार पेठेतील गुंड वैभव उर्फ पिंट्या माने याच्यासह तिघांना अटक करण्यात आली असून, अमली पदार्थ तस्करीमागे आंतरराष्ट्रीय तस्कर असल्याचा संशय आहे.

सविस्तर वाचा…

16:47 (IST) 19 Feb 2024
संरक्षण राज्यमंत्री म्हणाले, संरक्षण सामग्री निर्मितीमध्ये भारत…

पिंपरी : काही वर्षांपूर्वी भारताला रॉकेट, गोळी, बंदुकीसाठी दुसऱ्या देशावर अवलंबून रहावे लागत होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत ही संकल्पना आणली. भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका, स्वदेशी बनावटीचे ‘तेजस’ लढाऊ विमान, ‘प्रचंड’ हेलिकॉप्टर संरक्षण दलात दाखल झाले आहे.

सविस्तर वाचा…

16:46 (IST) 19 Feb 2024
देशातील पहिल्या प्रशिक्षण केंद्राची निविदा २३ फेब्रुवारीला, केंद्रामुळे कळंबोलीचे महत्व वाढणार

पनवेल : राज्य सरकार देशातील पहिले भव्य प्रशिक्षण केंद्र कळंबोली येथील सहा एकर भूखंडावर उभारत आहे. हे केंद्र उभारण्यासाठी सरकारने उद्योग विभागाला १७०० कोटी रुपयांच्या वित्त मंजूरी दिली आहे. २३ फेब्रुवारीला या केंद्राच्या बांधकामाची निविदा प्रसिद्ध होणार असून निविदा प्रक्रीया पुर्ण झाल्यावर पुढील ३ वर्षात हे केंद्र बांधून त्यामधून कौशल्यपुर्ण शिक्षण घेतलेले प्रशिक्षणार्थी राज्याला मिळतील. उद्योगमंत्री उदय सामंत यांचा हा महत्वकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पामुळे पनवेल व कळंबोलीचे महत्व राज्यात वाढणार आहे. 

वाचा सविस्तर…

16:30 (IST) 19 Feb 2024
बालाजी मंदिर भूखंड प्रकरण : महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाच्या परवानगीविषयी राष्ट्रीय हरित लवादाने मागितले स्पष्टीकरण

पनवेल : नवी मुंबईतील उलवे किनारपट्टीवरील तिरुपती बालाजी मंदिराला किनारपट्टी नियमन क्षेत्राची परवानगी मिळाली आहे. या परवानगीविषयी स्पष्टीकरण राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र सागरी किनारा व्यवस्थापन प्राधिकरणाकडे मागीतले आहे. यामुळे पुन्हा एकदा उलवे येथील बालाजी मंदीर भूखंड प्रकरण चर्चेत आले आहे.

वाचा सविस्तर…

16:13 (IST) 19 Feb 2024
जिल्ह्यात मार्चमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

नाशिक : जिल्ह्यात तीन मार्च रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून त्याअनुषंगाने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा शीघ्र कृती दलाची बैठक घेण्यात आली.

आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित बैठकीत संबंधित सर्व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते. या मोहिमेत शून्य ते पाच वर्ष वयोगटातील चार लाख, ३५ हजार, ३५६ बालकांना पल्स पोलिओची मात्रा देण्यात येणार आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी मोहीम प्रभावीपणे राबविण्याबाबत व शंभर टक्के लाभार्थी मोहिमेत पूर्ण करण्याबाबत सूचना दिल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे यांनीही नियोजनाची माहिती दिली. ११२ प्राथमिक आरोग्य केंद्र, ५९२ उपकेंद्र, पाच हजार अंगणवाडी केंद्राच्या माध्यमातून आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा कर्मचारी, ६०० पर्यवेक्षक यांच्या सहकार्याने नियोजन केले असल्याचे माता बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल नेहते यांनी सांगितले. तीन मार्च रोजी मात्रा घेण्यापासून राहणाऱ्या बालकांना पाच ते सात मार्च या कालावधीत घरोघरी जाऊन मात्रा देण्यात येणार आहे

बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल, सहायक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक लोणे, डॉ. युवराज देवरे आदी उपस्थित होते.

16:09 (IST) 19 Feb 2024
पुणे : वाघोली पोलीस चौकीसमोर पेटवून घेतलेल्या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यु

पुणे : अपमानास्पद वागणूक दिल्याने वाघोली पोलीस चौकीच्या आवारात पेटवून घेणाऱ्या तरुणाचा उपचारादरम्यान सोमवारी सकाळी मृत्यु झाला. रोहिदास अशोक जाधव (वय ३२, रा. वाघोली) असे मरण पावलेल्या तरुणाचे नाव आहे.

सविस्तर वाचा…

16:07 (IST) 19 Feb 2024
शिक्षक भरतीबाबत संभ्रम निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत देखरेख

पुणे : शिक्षक भरती प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असल्याने त्यात हस्तक्षेपाला वाव नाही. त्यामुळे अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा खोडसाळपणा करणाऱ्यांवर पोलिसांमार्फत स्वतंत्रपणे देखरेख करण्यात येत आहे , अशी माहिती शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी दिली.

सविस्तर वाचा…

16:06 (IST) 19 Feb 2024
मुंबई : मेट्रो ३ ची चाचणी रखडली

मुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ म्हणजेच मेट्रो ३ मार्गिकेतील आरे ते बीकेसी अशा पहिल्या टप्प्याची चाचणी (ट्रायल रन) फेब्रुवारीच्या मध्यावर केली जाणार असल्याचे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोशन (एमएमआरसी) कडून जाहीर करण्यात आले होते. मात्र अद्याप ही चाचणी रखडली आहे.

सविस्तर वाचा…

15:50 (IST) 19 Feb 2024
सातारा : पाचगणी खिंगर येथील टेन्ट हाऊस रिसॉर्टवर सातारा पोलिसांचा छापा, बारा बालांसह ४८ जणांवर कारवाई

वाई: पाचगणी खिंगर (ता महाबळेश्वर) येथील पाचगणी टेन्ट हाऊस या रिसॉर्टमध्ये बारबाला नाचवून पैसे उधळल्या प्रकरणी बारा बारबालांसह सोलापूर जिल्ह्यातील २४ खते औषधे बी बियाणे विक्रेते व इतर असे एकूण ४८ जणांवर सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अप्पर पोलीस अधीक्षक आंचल दलाल यांनी रिसॉर्टवर छापा टाकून कारवाई केली.

सविस्तर वाचा…

15:41 (IST) 19 Feb 2024
“महाराज खरंच येऊन बघा… गुंड चाकू, सुरे, कोयते, तलवारी…”, ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पत्र

ठाणे : ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंती निमित्ताने एक पत्र लिहीले आहे. महाराज खरंच येऊन बघा.. चाकू, सुरे, कोयते, तलवारी, बंदूका घेऊन गुंड सर्रास फिरत आहेत. कोण आमचा मुडदा पाडेल याची भिती स्त्यावरून चालताना वाटत आहे. हे आमच्या जीवावर उठले आहेत. तुमच्या राज्यात रयतेला अभय होते. आता आम्हाला कोण वाचविणार ? ती माती कुठे गेली महाराज? हे स्वराज्य नाही महाराज असे विचारे यांनी पत्रात म्हटले आहे.

वाचा सविस्तर…

15:23 (IST) 19 Feb 2024
‘या’ राज्यांत अवकाळी पावसाची शक्यता; विदर्भ, मराठवाड्याबाबत हवामान खात्याचा अंदाज काय? जाणून घ्या…

नागपूर : देशातील अनेक भागातून थंडीने आता पूर्णपणे काढता पाय घेतला असला तरी अवकाळी पाऊस मात्र पाठ सोडायला तयार नाही. फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्याच आठवड्यात देशातील अनेक भागांमधून थंडी गायब झाली असून उन्हाच्या झळा बसण्यास सुरुवात झाली आहे.

सविस्तर वाचा…

15:23 (IST) 19 Feb 2024
पुणे : एकतर्फी प्रेमाची अशीही तऱ्हा! प्रेमवीराचा तरुणीच्या दुचाकीला ‘जीपीएस’ लावून पाठलाग

पुणे : एकतर्फी प्रेमातून तरुणीच्या नकळत तिच्या दुचाकीला जीपीएस यंत्र लावून तिचा पाठलाग करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी बारामतीतील एका तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

सविस्तर वाचा…

15:20 (IST) 19 Feb 2024
डोंबिवलीत विद्यार्थ्याला मारहाण करणारे आरोपी मोकाट, ठाणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार

डोंबिवली : महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणाऱ्या एका २० वर्षाच्या विद्यार्थ्याला मद्याच्या धुंदीत असलेल्या आठ ते १० जणांनी काही दिवसापूर्वी ठाकुर्ली उड्डाण पुलाजवळ रात्रीच्या वेळेत बेदम मारहाण केली. मारहाण करणारी आठ ते १० मुले गरीबाचापाडा भागातील रहिवासी आहेत. ती मोकाट फिरत असुनही पोलीस त्यांना अटक करत नसल्याची तक्रार पीडित मुलाच्या वडिलांनी ठाणे पोलीस आयुक्तांकडे केली आहे.

वाचा सविस्तर…

15:20 (IST) 19 Feb 2024
“इतर पक्षांमधून होणाऱ्या इन्कमिंगमुळे भाजपाचा कार्यकर्ता व्यथित…”, प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंचं वक्तव्य

इतर पक्षांमधून भाजपात चालू असलेल्या इनकमिंगबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कुणीही आमच्या पक्षात आले तरी भाजपाचा कार्यकर्ता व्यथित होत नाही. कारण भाजपाचा कार्यकर्ता राष्ट्रप्रथम या भूमिकेतून काम करतो. भाजपा विचारधारेवर चालणारा पक्ष आहे, त्यामुळे फार चिंता करण्याची गरज नाही.

15:19 (IST) 19 Feb 2024
पनवेलमध्ये सोनसाखळी चोरट्यांनी वृद्धेला लुटले

पनवेल : मागील आठवड्यात खांदेश्वर आणि नवीन पनवेल वसाहतीनंतर सोनसाखळी चोरट्यांनी पनवेल शहरातील पायी चालणा-यांना लक्ष्य करण्यास सूरुवात केली. पनवेल शहरात रविवारी सायंकाळी साडेसात वाजता पायी चालणा-या ७१ वर्षीय वृद्ध महिलेला सोनसाखळी चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली.

सविस्तर वाचा…

14:40 (IST) 19 Feb 2024
धुळे : झोपडीत भाऊ-बहीण खेळत असताना लागली आग, अन्…

धुळे : जिल्ह्यातील लोणखेडी येथे झोपडीला अचानक लागलेल्या आगीत चिमुकल्या भाऊ- बहिणीचा होरपळून मृत्यू झाला. रेणू (चार वर्षे) आणि अमोल (सात वर्षे ) नाना पवार अशी दोघांची नावे आहेत.

वाचा सविस्तर…

14:40 (IST) 19 Feb 2024
धुळ्यात गुंडांचे पोलिसांना आव्हान, दहशत माजवणाऱ्याकडून दोन गावठी बंदुका जप्त

धुळे : शहरासह जिल्ह्यात पोलिसांपुढे दररोज गुंडांचे आव्हान उभे राहत असून गुंडांकडे बंदुका येतात तरी कुठून, असा प्रश्न धुळेकरांना पडला आहे. दहशत माजवण्याच्या उद्देशाने गावठी बंदुका घेऊन फिरणाऱ्या अशाच एका गुंडास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्याच्याकडून दोन गावठी बंदुका आणि दोन जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

वाचा सविस्तर…

14:29 (IST) 19 Feb 2024
खासगी वैद्यकीय महाविद्यालयात पदव्युत्तर डॉक्टरांच्या विद्यावेतन निकषाला छेद! निवासी डॉक्टर संतप्त…

नागपूर : भारतीय आयुर्विज्ञान परिषदेच्या निकषानुसार खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनाही शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांप्रमाणे विद्यावेतन मिळायले हवे. परंतु, राज्यातील खासगी वैद्यकीय महाविद्यालये कमी विद्यावेतन देऊन निवासी डॉक्टरांची बोळवण करत आहे. यामुळे खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टर संतप्त आहेत.

सविस्तर वाचा…

14:05 (IST) 19 Feb 2024
नाशिकमध्ये संभाजी चौकात पाणी पुरवठा विस्कळीत

नाशिक : शहरातील लवाटेनगर येथील जलकुंभातील वितरण प्रणालीतील दोषामुळे संभाजी चौकातील रहिवाश्यांना चार ते पाच दिवसांपासून पाणी टंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मनपाकडून पाणी पुरवठा सुरळीत होईल, असे वारंवार सांगितले गेले. परंतु, अद्याप अनेक भागात पाणी पुरवठा झाला नाही.

वाचा सविस्तर…

13:56 (IST) 19 Feb 2024
निर्यातबंदी उठविण्याची तयारी अन् नाशिक जिल्ह्यात कांद्याची उसळी

नाशिक : कांदा निर्यात बंदी काहीअंशी उठवण्याची तयारी सरकारने सुरू केल्यानंतर सोमवारी घाऊक बाजारातील कांदा दरात ६०० रुपयांनी वाढ होऊन ते क्विंटलला सरासरी १८५० रुपयांवर पोहोचले. शिवजयंतीमुळे सोमवारी बाजार समितीत कांद्याची आवक कमी आहे.

वाचा सविस्तर…

13:50 (IST) 19 Feb 2024
नागपूर : प्रेमसंबंध एकीशी अन् लग्न दुसरीशी… हळद लागण्यापूर्वीच नवरदेवाच्या हातात बेड्या…

नागपूर : एका तरुणाने एका तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. तिला लग्नाचे आमिष दाखवून तिच्याकडून १०.७३ लाख रुपये घेतले. मात्र, दुसऱ्याच तरुणीला जाळ्यात अडकवून लग्नासाठी निवड केली.

सविस्तर वाचा…

13:13 (IST) 19 Feb 2024
तलाठी भरती घोटाळा : निवड यादीत टॉपर असलेल्या दोन उमेदवारांविरुद्ध गुन्हे दाखल

नागपूर: लातूर येथील गुरू ऑनलाईन एक्झाम सेंटर येथे परीक्षा देणाऱ्या दोन उमेदवारांविरुद्ध धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे दोघेही निवड यादीत टॉपर आहेत.

सविस्तर वाचा…

13:11 (IST) 19 Feb 2024
बुलढाणा : राजकीय पद देण्याचे आमिष दाखवून विवाहितेवर अत्याचार; अमरावतीच्या महिलेने राजकीय लालसेत सर्वस्व गमावले

बुलढाणा : राजकीय पद देण्याचे आमिष दाखवून शेगावमधील एका कथित पुढाऱ्याने अमरावती येथील महिलेच्या अब्रूचे धिंडवडे उडविले. फेसबुकवर ओळख झालेल्या अमरावती जिल्ह्यातील ३८ वर्षीय विवाहित महिलेस पक्षाचे पद देण्याचे आमिष दाखवून त्याने तिला जाळ्यात ओढले.

सविस्तर वाचा…

13:10 (IST) 19 Feb 2024
लाच प्रकरणात पिंपरीतील सहायक पोलीस आयुक्त अडचणीत, गुन्हा दाखल न करण्यासाठी पाच लाखांची मागणी

पुणे : फसवणुकीचा गुन्हा दाखल न करण्यासाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सहायक आयुक्त मुगुटलाल पाटील यांच्या सांगण्यावरून एक लाखांची लाच घेणाऱ्या मध्यस्थाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) पकडल्यानंतर पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

सविस्तर वाचा…

13:08 (IST) 19 Feb 2024
पनवेलमध्ये शिवजन्मोत्सव निमित्त विविध कार्यक्रम

पनवेल ः पनवेल परिसरामध्ये शिवजन्मोत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन सोमवारी करण्यात आले. यामध्ये पनवेल महापालिका प्रशासनाने पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून ते मुख्य रस्त्यावरुन मिरवणूक काढली होती. यामध्ये विविध शाळेंमधील विद्यार्थी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षकांसह पालिकेचे अधिकारी व कर्मचारी तसेच राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. शिवकालिन पारंपारिक वेशभूषेमध्ये विद्यार्थी व महिलांनी या मिरवणूकीत सहभाग घेतला होता. चित्ररथामुळे पनवेलचे वातावरण शिवमय झाले होते. विद्यार्थ्यांनी लेझीम खेळ, ढोलपथकांच्या तालावर परिसर दणाणून निघाला होता. पनवेल शहरामधील मिरवणूकीच्या फेरीमध्ये विद्यार्थ्यांनी हातामध्ये लोकसंदेशाचे फलक घेऊन जनजागृती करण्याचा प्रयत्न केला.

शहरातील मुख्य चौकामध्ये भगव्या झेंडे व पताक्यांच्या माळ्यांमुळे शहरातील अनेक चौकाचा परिसर भगवा मय झाला होता. रात्रीच्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये उभारलेल्या अश्वारुढ शिवाजी महारांच्या पुतळ्याचा परिसरात पालिकेने केलेल्या विजेच्या आकर्षक रोषणाईमुळे हा परिसर नागरिकांचे आकर्षण बनले आहे. पालिका प्रशासनाने सोमवारी सकाळी ११ वाजता वासूदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये विद्यार्थी व नागरिकांसाठी शाहीर राहुल सोनावणे यांच्या पोवाड्याचे आयोजन केले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज हे व्यवस्थापनातील गुरु असलेले अनेक पैलु शाहीर सोनावणे यांनी उलघडून सांगीतले. तसेच प्रतापगडावर शिवाजी महाराजांनी याच गनिमीकाव्याने अफजल खानाचा केलेल्या वधाचे कथन पोवाड्यातून केले. त्यानंतर नाट्यगृहात गार्गी ग्रुपने शिवचरीत्र सादर केले. यावेळी लेझीम पथकासह अनेकांचा सत्कार पालिकेने केला. पनवेल शहरासह खांदेश्वर, नवीन पनवेल, कळंबोली, कामोठे व खारघर येथेही शिवजन्मोत्सवासाठी कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

13:03 (IST) 19 Feb 2024
इचलकरंजी सुळकुड पाणी योजना प्रश्र्नि महिलांचे उपोषण सुरू

कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेसाठी कागल तालुक्यातील दूधगंगा नदी पाणी योजना मंजूर झाले आहे. या पाणी योजनेच्या कामकाजाला सुरुवात होऊन इचलकरंजीला पाणी मिळावे या मागणीसाठी आज शिवजयंती दिनी इचलकरंजी येथे ‘आम्ही सावित्रीच्या लेकी’ या महिला संघटनेतर्फे सुळकूड पाणी प्रश्नी आमरण उपोषणास सुरवात झाली आहे. यामध्ये श्रीमती सावित्री हजारे, शोभा इंगळे,सुषमा साळुंखे, ज्योत्स्ना भिसे या सहभागी झाल्या आहेत,असे सुळकुड पाणी योजना कृती समितीने सांगितले.

इचलकरंजीला दूधगंगा नदीचे पाणी मंजूर झाले असताना कागल तालुक्यातील लोकांनी विरोध केला. नंतर त्यामध्ये राजकीय नेते उतरले. पालकमंत्री हसन मुश्रीफ ,भाजपचे नेते समर्जितसिंह घाटगे यांनी इचलकरंजीला दूधगंगा नदीतून पाणी देण्यास विरोध केला आहे. इचलकरंजीला पाणी दिले तर कागल तालुक्यात पिण्याला, शेतीला पाणी कमी पडेल अशी त्यांची भूमिका आहे. तर या प्रश्नावर मंत्रालयात मुख्यमंत्री समवेत बैठक घेण्यात येईल, असे आश्वासन उच्चतंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी इचलकरंजी मध्ये दिले होते. मात्र अद्यापही बैठक झाली नसल्याने इचलकरंजीतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. खासदार धैर्यशील माने, आमदार प्रकाश आवाडे यांना टीकेचे लक्ष्य केले जात आहे. दूधगंगा पाणी योजनेचा प्रश्न चांगला स्थापला आहे.

12:41 (IST) 19 Feb 2024
कोल्हापुरात पंचगंगा नदी पुन्हा प्रदूषित, वळीवडेत मृत मासे नेण्यासाठी गर्दी; नदी प्रदूषणावरून संताप

कोल्हापूर शहराच्या पूर्वेकडे असणाऱ्या वळीवडे गावामध्ये पंचगंगा नदीचे पाणी अत्यंत प्रदूषित झाले आहे. रसायन युक्त सांडपाण्यामुळे नदीतील मासे मोठ्या प्रमाणात मृत्युमुखी पडले आहेत. काही मासे तडफडून मरत आहेत. जीवन – मरणाच्या वाटेवर असणारे असे मासे गोळा करण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. तर असे मासे खरेदी करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.

वाचा सविस्तर…

12:24 (IST) 19 Feb 2024
रेल्वे प्रवाशांसाठी महत्‍वाचे! महाराष्‍ट्र एक्‍स्‍प्रेस २१ रोजी पुण्‍यापर्यंतच धावणार…

अमरावती : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील पुणे आणि मिरज विभागातील तारगाव, मसुर आणि सिरवडे स्थानकांदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू करण्यासाठी प्री-नॉन-इंटरलॉकिंग आणि नॉन-इंटरलॉकिंग कामासाठी ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेतले आहे. त्यामुळे गोंदिया-कोल्‍हापूर ‍महाराष्ट्र एक्स्प्रेस दि. २१ फेब्रुवारीला फक्त पुण्यापर्यंतच धावेल.

12:23 (IST) 19 Feb 2024
“महाराष्ट्रातून चार मुस्लीम खासदार लोकसभेत पाठवा,” असदुद्दीन ओवेसी यांचे आवाहन; म्हणाले, “धर्मातून नेतृत्व निर्माण झाले तरच…”

अकोला : देशातील १७ कोटी मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व मिळालेले नाही. केवळ मत देणारे न राहता मत घेणारे नेतृत्व समाजातून निर्माण झाले पाहिजे. महाराष्ट्रातून चार मुस्लीम खासदार लोकसभेत पाठवण्याचा निर्धार करा, असे आवाहन ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुस्लिमीनचे (एआयएमआयएम) राष्ट्रीय अध्यक्ष खासदार बॅरिस्टर असदुद्दीन ओवेसी यांनी येथे केले. ‘एआयएमआयएम’च्यावतीने शहरातील गडंकी मार्गावरील शाह जुलफिकार मैदान येथे रविवारी रात्री आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते.

सविस्तर वाचा…

12:22 (IST) 19 Feb 2024
“पोलीस आमच्या राज्यात आमचे काय बिघडवणार?” नितेश राणेंचे वादग्रस्त विधान, म्हणाले…

अकोला : पोलीस आमच्या राज्यात आमच्यावर काय करणार? त्यांना जागेवर राहायचे आहे की नाही? ते माझ्या भाषणाचे चित्रीकरण करून केवळ बायकोला दाखवू शकतील. पोलीस माझे काहीही बिघडवू शकत नाहीत, असे वादग्रस्त विधान भाजप आमदार नितेश राणे यांनी येथे केले.

सविस्तर वाचा…

12:07 (IST) 19 Feb 2024
कोल्हापुरात शिवजयंती उत्साहात; बोंद्रेनगरातील मराठा स्वराज्याचे आरमार आकर्षण

कोल्हापूर : शककर्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आज कोल्हापूरात उत्साही वातावरणात सुरुवात झाली. पन्हाळगडावरून आणलेल्या शिवज्योत, नानाविध देखावे, विविध स्पर्धा, चौका चौकात लाभलेले भगवे ध्वज त्यामुळे वातावरण शिवमय झाले आहे.

सविस्तर वाचा…

12:06 (IST) 19 Feb 2024
दहावी, बारावीच्या अभ्यासक्रमात मोठा बदल; दहावीला दहा विषयांचा तर बारावीला…

नागपूर : नवीन शैक्षणिक धोरणानुसार दहावी, बारावीत बदल केला आहे. हा बदल करताना भारतीय भाषांची सक्ती करण्यात आली आहे. तसेच मुख्य विषयांचे ज्ञान विद्यार्थ्यांना व्हावे, याबाबत विचार केला गेला आहे.

सविस्तर वाचा…

12:05 (IST) 19 Feb 2024
पंतप्रधानांमुळे लटकली पुणे मेट्रो! विस्तारित मार्गाच्या उद्घाटनाचा मुहूर्त पुन्हा लांबणीवर

पुणे : पुणे मेट्रोचे रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मोदींचा दौरा लांबणीवर पडला असल्याने उद्घाटनाचा मुहूर्तही पुढे ढकलावा लागला आहे.

सविस्तर वाचा…

12:04 (IST) 19 Feb 2024
Shiv Jayanti 2024 ‘शिवरायांच्या रणनीतीला मानवतेचा सुगंध,’ मुख्यमंत्र्यांचे शिवनेरी येथील सोहळ्यात उद्गार

पुणे : छत्रपती शिवराय आई भवानीला कौल मागण्याइतके धार्मिक होते. तेवढेच ते व्यवहारी आणि विज्ञाननिष्ठ होते. त्यांनी मायेने आपल्या प्रजेचा सांभाळ केला. छत्रपती शिवरायांनी तलवार हाती घेतली पण ती कधी निष्पापांच्या रक्ताने माखून दिली नाही. त्यामुळे शिवरायांच्या रणनीतीला रक्ताचा वास येत नाही तर मानवतेचा सुगंध येतो, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकुशलतेचे सोमवारी वर्णन केले.

सविस्तर वाचा…

12:00 (IST) 19 Feb 2024
अटल सेतूवरून ‘शिवनेरी’ धावणार

मुंबई : शिवडी ते नाव्हाशेवा दरम्यान नव्या ‘अटल सेतू’वरून एसटीची शिवनेरी बस सुरू करण्यात येणार आहे. पुणे ते मंत्रालय आणि स्वारगेट ते दादर शिवनेरी बसमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवासी बसतात.एवढ्याच तिकीट दरात पुणे-मुंबई-पुणे शिवनेरी बसचा प्रवास अधिक वेगवान होईल.

वाचा सविस्तर…

11:47 (IST) 19 Feb 2024
लोकसभा उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणाार? चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, “मोदींच्या संकल्पाला…”

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे सध्या ताकदीने काँग्रेसची बाजू मांडत आहेत. परंतु, अशोक चव्हाण, बाबा सिद्दीकींप्रमाणे वडेट्टीवारही लवकरच भाजपात जातील अशा अफवा पसरल्या आहेत. यावर भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. बावनकुळे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संकल्पाला साध देण्यासाठी जे लोक भाजपात येणार असतील त्यांच्यासाठी भाजपाचा दुपट्टा तयार आहे. परंतु, विजय वडेट्टीवार यांनी अद्याप आमच्याशी संपर्क साधलेला नाही.

10:41 (IST) 19 Feb 2024
चांदोली धरण परिसरात भूकंप

सांगली : चांदोली धरण परिसरात सोमवारी सकाळी भूकंप झाला असून ३ रिश्टर स्केल तीव्रतेचा सौम्य धक्का असल्याने कोणतेही नुकसान झालेले नाही. आज सकाळी ६ वाजून ४७ मिनिटांनी वारणावती पासून १४.४ किलोमीटर अंतरावर या भूकंपाचे केंद्र होते. सौम्य भूकंप असल्याने याची जाणीव झालेली नाही. भूकंपामुळे चांदोली धरणाला कोणतीही हानी पोहचलेली असून धरण सुरक्षित असल्याचे धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

10:36 (IST) 19 Feb 2024
“…तेव्हा मंडल आयोगाची चूक झाली”, मराठा आरक्षणावर उदयनराजे भोसलेंचं वक्तव्य

राज्यात मराठा आरक्षणाचा विषय चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटील हे त्यांच्या मागण्या घेऊन पुन्हा एकदा बेमुदत उपोषणाला बसले आहेत. दरम्यान, यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उदयनराजे म्हणाले, त्या काळात मोठी चूक झाली. मंडल आयोगासह इतरांकडून एक चूक झाली. केवळ मागासवर्गालाच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास वर्गालाही आरक्षण द्यायला हवं होतं. कोणीही, कुठल्याही जाती-धर्मातील व्यक्ती जर आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर त्या व्यक्तीला आरक्षण मिळायला हवं. परंतु, त्यांना आरक्षण नाही. या आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना मदत करणं हा विचार त्यावेळी करायला हवा होता आणि तो आरक्षणाच्या माध्यातून मांडायला हवा होता.

उदयनराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराज हे लोकशाहीचे जनक : उदयनराजे भोसले

छत्रपती शिवाजी महाराजांचे १३ वे वंशज उदयनराजे भोसले यांनी आज (१९ फेब्रुवारी) सकाळी नागपूर येथे शिवजयंती साजरी केली आणि सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या. यावेळी ते म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचं काम सर्वांनी केलं पाहिजे. महाराजांचा लोक कल्याणाचा विचार होता आणि शिवराय हे लोकशाहीचे जनक आहेत. भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील सरकार महाराजांचा हा विचार पोहोचवण्याचं काम करत आहेत. त्या जोडीने राज्यासह देशाचा विकास करत आहे.