मुंबई : राज्यभरात सध्या मोसमी पाऊस सक्रिय झाला आहे. मात्र, अजूनही काही भागात पावसाची प्रतीक्षा कायम आहे. दरम्यान, कोकणासह घाटमाथ्यावर पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हवामान विभागाने कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत पुढील चार दिवस अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. या कालावधीत कोकणात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर या घाट परिसरात शनिवारपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. याचबरोबर उत्तर महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांत बुधवारी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

तसेच विदर्भातील छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत पुढील चार दिवस हलक्या ते मध्यम सरी कोसळण्याची शक्यता आहे. तर उर्वरित भागात हलक्या सरींचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. दरम्यान, पावसाने उघडीप दिल्याने काही भागात कमाल तापमानात वाढ झाली आहे. त्यामुळे दिवसभर असह्य उकाडा सहन करावा लागत आहे.

सध्या ऊन, सावली असे वातावरण आहे. राज्यात सर्वाधिक तापमानाची नोंद मंगळवारी अलिबाग येथे झाली. तेथे ३२.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. मुंबईतही मंगळवारी उकाडा सहन करावा लागला. संपूर्ण दिवसभर पाऊस पडलेला नाही. अनेक भागात कडक ऊन होते. मुंबईत बुधवारी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

पावसाचा अंदाज कुठे

मुसळधार पाऊस
मुंबई, ठाणे, पालघर

अतिमुसळधार पाऊस
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक घाट परिसर, पुणे घाट परिसर, कोल्हापूर घाट , सातारा घाट परिसर

वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज
छत्रपती संभाजीनगर, जालना, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हलक्या सरींचा अंदाज
पुणे, अहिल्या नगर, सांगली, सोलापूर, परभणी, बीड, हिंगोली , नांदेड , लातूर, धाराशिव.