जगभरच्या बनावट शोधनिबंधांत एकटय़ा भारताचा वाटा २७ टक्के आहे, ही विचार करायला लावणारी बाब..

दारिद्रय़ हे केवळ आर्थिकच असते असे नाही. ते सांस्कृतिकही असते, शैक्षणिकही असते. समाज सांस्कृतिक आणि शैक्षणिकदृष्टय़ा श्रीमंत असेल, त्याचा गाडा धीमंत चालवत असतील, तर दारिद्रय़ावर मात करता येते. पण दारिद्रय़च सांस्कृतिक आणि शैक्षणिक असेल, तर सगळा समाज रसातळाला जाण्यास वेळ लागत नाही. हे गत्रेत कोसळणे एका दिवसात होत नसते. अनेकदा तर तसे काही घडत आहे हे जाणवतही नसते. त्याचा पत्ता लागतो, तेव्हा वेळ गेलेली असते. हल्ली आपल्या देशात इतिहासप्रेमाला भलतेच उधाण आलेले आहे. ते किंचित बाजूला ठेवून आणि डोळ्यांवरील विकृत अस्मितांची िभगे काढून स्वच्छ नजरेने पाहिल्यास इतिहासात अशा प्रकारची समाजऱ्हासाची अनेक उदाहरणे दिसतील आणि आपला समाजही त्याच ऱ्हासाकडे कदमताल करीत निघाला आहे की काय अशी भयशंका मनात निर्माण होईल. ही शंका अनेकांना अवास्तव वाटू शकते. कुणाला ती प्रलयघंटावादीही वाटू शकते. परंतु आपल्या ज्ञानक्षेत्रातील सध्याचे वातावरण त्या शंकेला आधार देणारेच असून, ‘नेचर’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकात अलीकडेच प्रसिद्ध झालेल्या एका विस्तृत लेखाने हा आधार आणखी बळकट केला आहे. एकूण ३२ लेखकांच्या चमूने लिहिलेला तो अवघ्या दोन हजार ३८५ शब्दांचा लेख. परंतु त्याने जागतिक पातळीवरील संशोधन क्षेत्रात भूकंप घडवून आणला आहे. अनेक महिने संशोधन, विश्लेषण करून लिहिलेल्या या लेखातून आंतरराष्ट्रीय स्तरावर चाललेल्या बनावट संशोधनपत्रिकांच्या उद्योगाचा गौप्यस्फोट करण्यात आला आहे. आपल्या दृष्टीनेही तो विशेष महत्त्वाचा आहे. याचे कारण त्यात या उद्योगाच्या लाभार्थीमध्ये भारतीय प्राध्यापक-संशोधकांचा बराच वरचा क्रमांक आहे. आपल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक ऱ्हासाची पातळी कुठपर्यंत घसरलेली आहे यावर त्यातून नेमके बोट ठेवलेले आहे आणि म्हणूनच तो लेख नेमके काय सांगतो हे समजून घेतले पाहिजे.

‘नेचर’च्या लेखकचमूने जगभरातील सुमारे साडेतीन हजार शोधनिबंधांचा अभ्यास केला. त्यातील एक हजार ९०७ शोधनिबंध हे दर्जाहीन बनावट पत्रिकांमध्ये प्रकाशित झाल्याचे आढळून आले. हे शोधनिबंध होते जैववैद्यकीय विषयावरचे. आपल्यासाठी लक्षणीय बाब म्हणजे त्यांपैकी २७ टक्के शोधनिबंध हे भारतीय प्राध्यापक-संशोधकांचे होते आणि त्यात महाराष्ट्रातील काही संस्था आणि महाविद्यालयांचाही समावेश होता. आता याचा नेमका अर्थ काय? समजा दर्जाहीन संशोधनपत्रिकेतून एखादा शोधनिबंध प्रकाशित झाला, तर त्याने काय बिघडले? त्याने त्या प्राध्यापक-संशोधकांचे काहीच बिघडत नाही. विद्यापीठ अनुदान आयोगाने सात वर्षांपूर्वी एक कायदा केला होता त्यानुसार प्राध्यापकांना पगारवाढ आणि पदोन्नतीसाठी अन्य काही अटींबरोबरच असे शोधनिबंध प्रकाशित करणे आवश्यक करण्यात आले होते. त्यासाठी काही गुण देण्यात येत. हे शोधनिबंध प्रसिद्ध करायचे, तर त्यासाठी पत्रिका तर हव्यातच. तेव्हा या पत्रिकांचा उद्योग उभा राहिला. काही प्राध्यापकांनी, संस्थांनी तो सुरू केला. आता त्यातील काही पत्रिका दर्जाहीन असल्या म्हणून काय झाले? त्याने लगेच शैक्षणिक ऱ्हास सुरू झाला म्हणून ओरडा करण्याचे काय कारण? खुबी यातच आहे. या पत्रिका दर्जाहीन असतात याचा अर्थच त्यात प्रसिद्ध होणारे शोधनिबंध हे दर्जाहीन असतात. पत्रिकांच्या संपादकांनी त्यांचा दर्जा तपासून घेणे आवश्यक असते. परंतु ते केले जात नाही. पैसे देऊन कोणत्याही प्रकारचे भिकार शोधनिबंध त्यात छापले जातात. पत्रिकांना पैसे मिळतात आणि प्राध्यापकांचे भले होते, असा हा सगळा व्यवहार आहे. ही गोष्ट उत्तम प्रकारे संशोधन करणाऱ्या, प्रतिष्ठित पत्रिकांत ते प्रसिद्ध करणाऱ्या प्राध्यापक-संशोधकांवर अन्याय करणारी तर आहेच, परंतु हे प्रकार एकूण संशोधन क्षेत्रातील गुणवत्तेलाही मारक आहेत. हेच संशोधक-प्राध्यापक आपल्या अशा तिय्यम दर्जाच्या अभ्यासाच्या जोरावर वरच्या श्रेण्या मिळवून विद्यार्थ्यांना ज्ञानदान करीत असतात. यातीलच बरेचसे पुन्हा वर नाक करून गुणवत्ताशाहीचे गोडवे गात असतात. विज्ञान क्षेत्रात असे घडणे हे तर अधिक भयंकर. ‘नेचर’च्या लेखाचे शीर्षक ‘माणसे, प्राणी आणि पैसे यांची उधळपट्टी थांबवा’ असे आहे. परंतु प्रश्न केवळ या उधळपट्टीचाच नाही. तर तो भावी पिढीच्या बर्बादीचाही आहे. आपल्यासाठी अधिक चिंतेची बाब म्हणजे महाराष्ट्रातही गेल्या अनेक वर्षांपासून हे विज्ञानाबरोबरच कला क्षेत्रातही सुखेनव सुरू आहे. राज्यातील दहाही विद्यापीठांच्या कक्षेत ही शोधनिबंधांची दुकानदारी गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. नियतकालिकांसाठी आवश्यक असलेला ‘इंटरनॅशनल स्टॅण्डर्ड सीरियल नंबर’ मिळवायचा, देशातील ‘रजिस्ट्रार ऑफ न्यूजपेपर्स’कडे नोंदणी करायची. त्यासाठी फारसा खर्च नसतोच. त्या आधारे ‘आंतरराष्ट्रीय’ वा ‘राष्ट्रीय’ नियतकालिके सुरू करायची आणि त्यात पैसे घेऊन तथाकथित शोधनिबंध छापायचे असा हा उद्योग. तो करणारे हात प्रामुख्याने या राज्यातील गुरुजनांचेच आहेत हे विशेष आणि केवळ बढती आणि वेतनवाढ यांचा लाभ उकळण्यासाठी असंख्य प्राध्यापक त्याला हातभार लावीत आहेत. मार्च २०१३ मध्ये या सगळ्या प्रकरणावर ‘लोकसत्ता’ने प्रकाश टाकला होता. माहितीची चोरीमारी करून तयार करण्यात येत असलेल्या या अशा बनावट शोधनिबंधांच्या साह्य़ाने अनेकांनी पीएच.डी.सारख्या पदव्या प्राप्त केल्या आहेत. आपल्या नावापुढे डॉक्टर ही उपाधी मिरवीत ही मंडळी आज समाजात शाल-श्रीफळ घेत फिरत आहेत.

ज्ञान आणि माहिती, प्रज्ञा आणि हुशारी या संकल्पनांच्या अर्थाची भीषण गल्लत, नियम आणि नतिकता गोष्टींची मनमानी मोडतोड यातून हे सारे होत आहे. ही सारी आपल्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक ऱ्हासकालाचीच पदचिन्हे. परंतु त्याची पर्वा कुणाला आहे? एके काळी या देशातील विद्यापीठांतून ज्ञानाची निर्यात होत असे. हा वारसा आजही अभिमानाने मिरवतो आपण. पण एकदा इतिहास आणि परंपरा यांतच रमायचे ठरले, की मग उरते तेवढेच – रमणे. आणि मग याच देशातील हजारो विद्यार्थी चांगल्या शिक्षणाच्या शोधात परदेशात का जातात, येथील शिक्षणव्यवस्थेचे तीनतेरा का वाजलेले आहेत आणि मुख्यत: एक समाज म्हणून आपली शैक्षणिक आणि सांस्कृतिक पातळी का घसरली आहे असे प्रश्नच भेडसावेनासे होतात. याला प्रतिवाद म्हणून आपण आपल्याकडील सुविधांची कमतरता यांसारख्या गोष्टींना जबाबदार धरू शकतो. येथे खऱ्या ज्ञानवंतांची कदरच केली जात नाही, ‘हार्वर्ड विरुद्ध हार्डवर्क’ असा दोन टोकांचा शब्दखेळ मांडून एकंदर ज्ञान, प्रज्ञा, विचार आदींबाबतची तुच्छता निर्माण केली जाते, अशा वातावरणात हेच घडणार असेही म्हणू शकतो. परंतु हे कारणे देणे झाले. त्यातून आपण आपल्या अनैतिकतेवर पांघरूण घालूही शकतो. मात्र त्यातून ‘विद्यार्थी’ आणि ‘गुरू’ म्हणून असलेल्या आपल्या जबाबदारीतून आपली सुटका होणार नाही.

समाजातील सर्व प्रतिकूलतेवर मात करून ज्ञानाची उपासना करणे हेच ‘विद्यार्थी’ आणि ‘गुरू’चे भागधेय आणि त्यांना धीमंत बनण्यासाठी योग्य परिस्थिती निर्माण करून देणे हे समाजाचे कर्तव्य. जेव्हा दोघांनाही त्याचा विसर पडतो, तेव्हा मग साऱ्याच बाबींचा बाजार सुरू होतो. आज तोच जोरात सुरू आहे. विद्यापीठे ही आजची राजकीय कुरुक्षेत्रे बनली आहेत. विद्यार्थ्यांच्या मुसक्या आवळल्या जात आहेत आणि त्यांचे गुरुजन वाङ्मयशर्वलिक बनून श्रेण्या आणि वेतनवाढीच्या स्पर्धेत धावत आहेत. ही आपल्या ज्ञानक्षेत्राची गत. हे सारे अत्यंत निराशाजनक, काळोखे वाटेल. परंतु ते तसेच आहे. आता आपण सर्वानीच शहामृगाप्रमाणे वाळूत तोंड खुपसून बसायचे ठरविले असेल, तर मग सारेच संपले.. आणि एकदा सर्वाचेच शहामृग झाले, की मग काय, बनावटांच्या बकवादातही ज्ञानामृतच दिसणार.


एकही प्रतिक्रिया नाही

Comments have been closed.

लोकसत्ता 'ब्लॉग बेंचर्स'वरील ब्लॉगवर तुमची प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या मित्र-मैत्रिणींसोबत तुमची प्रतिक्रिया शेअर करून त्यांना ती वाचायला आणि लाईक करायला जरूर सांगा. 'लोकसत्ता'च्या परीक्षक मंडळाच्या निर्णयाव्यतिरिक्त तुमच्या प्रतिक्रियेला मिळालेल्या लाईक्सचाही स्पर्धेचा विजेता/विजेती निवडताना विचार केला जाईल.