नवी दिल्ली : कोविड १९ बाबतच्या माहितीचा विषाणूला रोखण्याऐवजी त्याचा वापर गैरप्रचारासाठी किंवा प्रपोगंडासाठी केला जात आहे, असा आरोप काँग्रेसनेत्या प्रियंका गांधी यांनी केला आहे. जिम्मेदार कौन प्रचार मोहिमेत त्यांनी सरकारला काही प्रश्न विचारीत आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. सरकारने करोनाची परिस्थती योग्य प्रकारे हाताळली नाही. माहितीचा वापर विषाणूला रोखण्याऐवजी गैरप्रचारासाठी करण्यात आला, असे त्यांनी स्पष्ट केले. केंद्राला प्रश्न विचारताना त्यांनी म्हटले आहे की, कोविड मृत्यूंची अधिकृत आकडेवारी व अनधिकृत आकेडवारी यात एवढा फरक का आहे. सरकारने माहितीचा वापर गैरप्रचार म्हणजे प्रपोगंडासाठी का केला त्याऐवजी तो विषाणू रोखण्यासाठी का करण्यात आला नाही. प्रियंका गांधी यांनी त्यांच्या या प्रश्नांची चित्रफीत ट्विटर व फेसबुकवर टाकली असून त्यांनी म्हटले आहे की, जगातील तज्ज्ञांनी माहिती जाहीर केली पण भारत सरकारने केली नाही. पारदर्शकतेच्या माध्यमातून ही लढाई आपण जिंकू शकतो. सरकारने माहिती उघडपणे का मांडली नाही असा सवाल त्यांनी केला. सोमवारी श्रीमती गांधी यांनी केंद्रावर कोविड साथीची माहिती लपवल्याचा आरोप केला होता. मोदी सरकारने लोकांचे प्राण वाचवण्याऐवजी माहितीचा वापर गैरप्रचारासाठी केला. त्यामुळे लोकांचे प्राण वाचण्याऐवजी मोठे नुकसान झाले. सरकारने करोनाची परिस्थिती ज्या पद्धतीने हाताळली त्यावर काँग्रेसने नेहमीच टीका केली. सरकारने ती  फेटाळून लावली.